ShareThis

Wednesday, November 13, 2013

विनोद...!

बातम्या, क्रिकेट आणि इंग्रजी सिनेमे  याशिवाय टीव्ही कडे अभावानेच वळणाऱ्या आमच्या एक्स जनरेशनने मराठी वाहिन्यांची दखल घेणे तसे दुरापास्तच. 'फू बाई फू' या अलीकडे लोकप्रिय(?) आणि हास्यास्पद झालेल्या 'रियालिटी शो' ला आमच्या सारखा प्रेक्षक कधीमधी मिळवून देण्यात सतीश तारे, भाऊ कदम, सुप्रिया पाठारे, संतोष पवार, किशोरी अंबिये अशा स्वाभाविक विनोदी अभिनेत्यांबरोबरच ताज्या दमाच्या प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, हेमंत ढोमे आणि माधवी जुवेकर यांचा सिहांचा वाटा. तथापि, वेळेची मुबलक उपलब्धता, कुठल्याही हास्यास्पद गोष्टीवर अखंड आणि निष्कारण हसण्याची उर्जा आणि नाटकी, उथळ समीक्षा, हे अर्चना पुरण सिंग आणि अरबाज / सोहेल खान यांचे 'कौमेडी सर्कस' हे नाव सार्थ करणाऱ्या कार्यक्रमातील परीक्षण(?!?) हुबेहूब वठवण्यासाठी केलेली स्वप्नील जोशी आणि अश्विनी यांची नेमणूक ही या कार्यक्रमाच्या सहा पर्वातील सगळ्यात विनोदी गोष्ट ठरावी!


संदर्भ: कालचा 'फू बाई फू' चा ताजा एपिसोड. प्रियदर्शन जाधव आणि माधवी जुवेकरने संगीताचा जो काही क्लास घेतला त्याने महेमूद आणि मनोरमाची आठवण आली. प्रियदर्शनची प्रत्येक वेळी सतीशशी तुलना करून त्याच्या (प्रियदर्शनच्या, स्वप्नीलच्या नव्हे) स्वत:च्या अंगभूत आणि आत्यंतिक लवचिक विनोद-प्रतिभेचा उपमर्द करण्यात स्वप्नीलचे जे काही 'एक्सपर्टांइज' दिसते (कुणाला?) ते नेहमीच क्लेशदायक असते परंतु काल माधवीने संपूर्ण वेळ आवाजाची जी कसरत केली त्याची प्रशंसा तर दूर साधा उल्लेखही होऊ नये हे फारच खटकले. तीच बाब अंशुमनच्या 'बेवड्या'च्या बेअरिंगची. असले बारकावे हेरून त्यांची यथायोग्य मीमांसा आणि वाहवा करता येत नसेल तर हे परीक्षक काय कलाकारांना स्वत:च्या घरचे पदार्थ खाऊ घालण्यापुरते ठेवलेत काय…? अश्विनीच्या पात्रतेचा तर संबंधच येत नाही कारण तिला मुळात स्वत:ची तरी ओळख कुठेय? हे लिहितांना प्रस्तुत 'समीक्षका'ला (हे दोघे 'परीक्षक' होवू शकतात या न्यायाने) तिचे आडनाव देखील ठाऊक नाही आणि जाणून घेण्याची तसदीही घ्यावीशी वाटली नाही यातच सगळे आले.


मुद्दा एवढाच की मुळातच सुसह्य परंतु अतिशय दुर्मिळ असणाऱ्या, फारसा भेजा फ्राय न करता कधीकधी बेताचे मनोरंजन सुद्धा करू शकण्याची क्षमता बाळगणाऱ्या मराठी कार्यक्रमांची मराठीला गरज असतांना, त्या कार्यक्रमातील कलाकारांचे मनोधैर्य वाढून त्यांना आणखी सकस, सृजनशील आणि बावनकशी कामगिरी करण्याचा हुरूप येण्यासाठी, त्यांच्या प्रतीभेला न्याय देवून ती फुलवू शकणाऱ्या परीक्षकांची वानवा आहे, गरजच वाटत नाही की 'मजबूरी'? अत्यंत अभ्यासू, मार्मिक आणि विचक्षण निरीक्षण-परीक्षण सिद्धी असलेल्या तंबी दुराई, ब्रिटीश नंदी, चहाटळ या नामधारी तथा शिरीष कणेकर, शरद वर्दे, मंगला गोडबोले, शफाहत खान, मंगेश तेंडूलकर अशा नामवंत राजहंसी दिग्गजांचा या सांस्कृतिक योगदानासाठी विचार करण्यास काय प्रत्यवाय असावा…? (प्रस्तुत समीक्षक, या नावांचे नामांकन अथवा शिफारस करीत नसून केवळ विचारांना दिशा देण्यासाठी हे प्रयोजन आहे याची जाणीव असावी. तसा सामिक्षकाकडे पद्म्च काय छद्म देखील पुरस्कार नसल्याने तो परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही त्यातल्या त्यात निर्विवाद आणि समाधानाची गोष्ट…!) आणि यातली कुठलीही गोष्ट काही 'तांत्रिक' तथा 'अपरिहार्य' कारणांमुळे शक्य नसल्यास 'केबीसी'चा 'ऑडीयन्स पोल बाय व्होटिंग मीटर'चा पर्याय काय वाईट आहे…?!?

No comments:

Post a Comment