ShareThis

Tuesday, November 1, 2011

भेटी लागी जीवा...!


प्रिय मित्रांनो,

काल दि. २९ ऑक्टोबर २०११ च्या शनिवारी न्यू सिटी हायस्कूलचा जो वर्ग अक्षता लौन्स्वर भरला तो केवळ अविस्मरणीय आणी नितांत आनंददायी होता, एव्हढेच नव्हे तर तो कधीही सुटू नये अशी जी सामुहिक भावना प्रत्ययास आली तिची गोडी सीताफळ रबडी इतकीच अवीट...! या निमित्ताने बरोब्बर २५ वर्षांनंतर आपल्या सर्वांच्या भेटीचा जो योग आला त्याची आवर्तन आणी स्पंदन, निदान काही काळ तरी, आपल्या भावविश्वाला रोमांचित आणी समृद्ध करतील ही केवळ आशा नव्हे तर विश्वास आहे.


या कार्यक्रमासाठी 'संकल्पना ते अविष्कार' यांत ज्यांचा पुढाकार आणी मेहनत होती त्यांना धन्यता वाटल्याचे ऐकून खूप समाधान वाटले. २५ वर्षे एव्हढ्या प्रदीर्घ खंडानंतर सर्व वर्गबंधुंना अक्षरश: जगाच्या कान्याकोप-यातून शोधून, संपर्क करून, भेटून त्यातील बहुतांश सर्वांना एका ठिकाणी जमविण्यासाठी खचितच संघटन कौशल्य आणी स्नेहार्द्र आपुलकीची गरज होती. या गुणवैशीष्ट्यांच्या धारणेपासून संगोपनापर्यंत ज्यांनी अथक आणी नि:स्पृह प्रयत्न केले त्या विजय वाघ, मनोज सातभाई, महेश सोनवणे, शिवकुमार डोंगरे, अनिरुद्ध नांदेडकर, राजेंद्र ठुसे, शाम पुराणिक या व भावनावेगात ज्यांचा नामोल्लेख करायचा राहून गेला असेल त्या सर्व मित्रवर्यांचे, औपचारिकतेचा आरोप पत्करूनही शतश: आभार...!


एव्हढ्या सविस्तर विवेचनाचे प्रयोजन असे की 'विशफुल थिंकिंग' आणी 'एक्झीक्यूशन' यांत कायमच जी कृतीशुन्यतेची दरी असते ती उत्कटतेच्या आवेगाची धार बोथट करते. तथापी या सर्व सवंगड्यांनी क्रियाशील उपक्रमाच्या एकेका दोरीने या भाबड्या आशावादाच्या आणी अंमलबजावणीच्या दरम्यान जो स्नेहबंधाचा पूल बांधला त्यावरून कितीतरी मने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बांधली गेली आणी हे स्नेहमिलन आपले नाव सार्थ करीत 'आनंद सोहळा' ठरला.


या कार्यक्रमाच्या संयोजकांचा अंतस्थ हेतू हा केवळ 'पुनर्मिलन' व 'सदिच्छा भेटी' असा निर्मम व निरलस होता तरी या अनुबंधाचे मूळ कारण आणी स्त्रोत म्हणजे आपली सर्वांची प्राणप्रिया शाळा 'न्यू सिटी हायस्कूल', जिचा संदर्भ, उल्लेख आणी कळकळ व्यक्त होणे हे स्वाभाविकच होते. तथापी 'न्यू सिटी हायस्कूलचा सर्वांगीण विकास आणी संसाधन' हा विषय शाळेच्याच संस्कारानुरूप अत्यंत योजनाबद्ध आणी शिस्तशीरपणे हाताळला जावा व त्यासाठी आवश्यक असणारी मनोभूमिका आणी वैचारिक बैठक यासाठी कालचे व्यासपीठ फारसे अनुकूल आणी पर्याप्त नसल्याने त्या चर्चेची परिणीती थोडीफार भरकटलेली आणी काहीशी शब्दबंबाळ झालेली जाणवली.


या विषयात आणी एकूणच वक्तव्यात माझ्याकडून देखील कुणाच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. तेव्हा जर असे काहीं घडले असेल आणी कुणाला माझ्या अत्यंत प्रामाणिक आणी परखड अशा अभिव्यक्तीने काहीं क्लेश झाले असतील तर मी इथे उधृत करू इच्छितो की माझा तसा काहीही हेतू अथवा प्रयत्न नव्हता व अजाणतेपणी काहीं अप्रस्तुत, वावगे किंवा व्यक्तिश: बोलले गेले असेल किंवा त्याचा ध्वनितार्थ तसा भासला असेल तर मी आपला सर्वांचा क्षमाप्रार्थी आहे.

या स्नेहमिलनाने आपणा सर्वांना जो अलौकिक आणी एकमेवाद्वितीय आनंदानुभव दिला त्यावर क्षुल्लक कारणांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुक्ष्मशा देखील कटुतेची अथवा विषादाची सावली नको म्हणून हा पत्रप्रपंच...! शिवाय शाळूमित्रांच्या एका हाकेला सर्व सख्या-सोबतींनी अत्यंत स्वयंस्फूर्तप जो मनस्वी प्रतिसाद दिला तो पाहता आयोजकांचा उत्साह तर दुणावला असेलच पण इतरांनाही यातून प्रेरणा व स्फूर्ती मिळाली असेल. तेव्हा या उपक्रमाच्या अत्यंत स्तुत्य आणी अनुकरणीय बाबतीत शुभेच्छा एव्हढीच की...

सदिछेच्या फुलांना
दुराव्याचा गंध...
भेटीमुळे होतात
दृढ अनुबंध...!पुन्हा भेटण्यासाठी निरोप घेण्यापूर्वी काल मी ज्या मित्राचा निरंतर संवादासाठी उल्लेख केला त्या 'दिना' अर्थात 'दिनेश चंद्रात्रे' कडून नेहमीप्रमाणेच अगदी योग्यवेळी आलेल्या चपखल आणी सुनिर्देषित SMS ने शेवट करतो...

Every relationship in life should be like the hands of clock...

No matter if one is faster or slower,

All that matters is S-T-A-Y C-O-N-N-E-C-T-E-D...!

मेसेज पुरेसा बोलका असल्याने समारोपाला उगाच फुटेज खात नाही. आपल्या सर्वांना आयुष्यात इप्सित मनोकामना पूर्ण करण्यासाठी संधी, क्षमता आणी प्रज्ञा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

पुन्हा भेटूच, तोपर्यंत...

भेटी लागी जीवा...!

No comments:

Post a Comment