प्रिय दादा,
एसेमेस मध्ये प्रतिक्रिया मावणार नाही म्हणून हा पत्रप्रपंच...!
परवा 'दुनियादारी' बघितला. दिवस सुरेख गेला आणि 'सुशी'च्या (अन इतर ससंदर्भ) आठवणींनी भरून आलं. कपाळावर हात मारायची वेळ आली नाही याबद्दल संजय जाधवचे आभार आणि कौतुकही…!
सिनेमा म्हणून चांगला आहे. मराठी सिनेमा म्हणून आणखी चांगला होऊ शकला असता. सुशीच्या कथेसाठी अधिक मेहनत अपेक्षित होती, पण प्रयत्न स्तुत्य आहे आणि एकदा तरी बघायलाच हवा.
नेहमीप्रमाणे गाणी अनावश्यक, अंगावर येणारे पार्श्वसंगीत अत्यंत भडक, टोटल फिल्मी आणि ब-याच ठिकाणी केवळ अप्रस्तुतच नाही तर रसभंग करणारे. हीच गोष्ट काही पात्रे /संवाद यांनाही लागू.
आपल्याला 'दुनियादारी' पाहिल्यांदा वाचून किती वर्ष झाली? त्यातले किती डीटेल्स अजूनही लख्ख आठवतात? 'सुशि'बद्द्लच्या प्रेमात किती फरक पडलाय? आपले वय आपल्याला आड येते का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे काहीही असली तरी 'दुनियादारी' एकदा पहायला काहीही हरकत नाही. मित्रांची कंपनी मिळाल्यास भावनांचे फुटणारे बांध आणि उमाळ्याचे आवेग आटोक्यात राहतील अशी सदिच्छा!
शेवटी फक्त एक अट - सिनेमाचा आनंद घेऊन झाल्यावर त्याचा ख-या 'दुनियादारी'शी संबध जोडत बसण्यापेक्षा निवांत सवड काढून पुन्हा एकदा 'दुनियादारी' चे पारायण (शक्यतो एका बैठकीत) करावे.
हे व्रत केल्याने 'आमके आम गुठलीयोंके दाम' अशा प्रचीतीची संभावना वाढते आणि गतस्मृतींना उजाळा मिळून आपल्या कौलेजच्या दिवसांना आणि तत्कालीन भाव-भावनांना एक झळाळी प्राप्त होते. इत्यलम!
ता.क. - स्टोरी पुण्याच्या एस्-पीची असल्याने पुण्यात तुफान चाललाय, अगदी अमिताभच्या काळाची आठवण यावी अशी झुंबड! इतरत्रही अशीच परिस्थिती आहे म्हणतात… सुशीच्या आत्म्याला किती सुख होईल…!
मनीष
हे पत्र मी माझ्या प्रिय मित्र आणि बंधूला लिहिले असल्याने त्याची जातकुळी तथाकथित समीक्षेसारखी असणे शक्य नाही आणि ती तशी अपेक्षितही नाही. तथापि चित्रपट म्हणून त्यावर मत द्यावयाचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे -
दिग्दर्शन, चित्रीकरण आणि गाणी यावरील थेट शोलेपासून ते अगदी मुन्नाभाई पर्यंतचा प्रभाव लक्षणीय असला तरी थियेटर हाऊसफुल्ल होणे तथा टाळ्या, शिट्ट्या आणि 'एक्स्पर्ट कॉमेंटस'नी दणाणून सोडणे हा अलीकडे अभावानेच येणारा प्रत्यय काहीसा त्रासदायक (वयोमानामुळे) पण खूपसा आनंददायी (तादात्म्यामुळे) ठरला. त्यातून संजयने सुरवातीलाच 'सुशी'ला कथेचे संपूर्ण श्रेय देऊन, चूक-उणीवांबद्दल माफीही मागितली असल्याने तक्रारीला जागाच नाही…!
असो.